मुंबई: मुंबईच्या चारकोप परिसरात राहणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पदाधिकारी गुरुजी उर्फ ऋषी पांडे याला महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. पांडे हा पोलिसांसोबत ओळख आहे, तुम्हाला मदत करतो असे सांगून अनेकांकडून लाखो रुपये उकळत होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांना गुंगारा देत आरोपी ऋषी पांडे हा मथुरा, गुजरात सोमनाथ उज्जैन अशा विविध मंदिरात जाऊन देवदर्शन करून अयोध्येला जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी गुजरात येथून त्याला अटक केली आहे. आरोपी पांडे हा सध्या बोरिवली पोलिसांच्या ताब्यात असून त्याने कुणाकुणाची फसवणूक केली यासंदर्भात अधिक तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली परिसरात राहणाऱ्या एका महिलेने फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. या फेसबुक पोस्टवरून मोठा वादही निर्माण झाला होता. परिणामी प्रकरण बोरिवली पोलीस ठाण्यात गेले. दरम्यानच्या काळात महिलेची ओळख गुरुजी उर्फ ऋषी पांडे याच्यासोबत झाली. ऋषी पांडे याने माझी पोलिसांसोबत ओळख असून प्रकरण मिटवण्यासाठी महिलेकडून पोलिसांच्या नावावर चेक द्वारे लाखो रुपये घेतले, मात्र या प्रकरणात पांडेंकडून महिलेला कोणतीही मदत झाली नाही.
यानंतर महिलेने ऋषी पांडेंकडे दिलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. पांडेंने महिलेचे फोन घेणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात येताच तिने गुरुजी उर्फ ऋषी पांडे विरोधात तक्रार दिली. त्यानुसार बोरिवली पोलिसांनी आरोपी विरोधात कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी एपीआय बापू घोडके आणि पीएसआय कल्याण पाटील यांच्या तपास पथकाने आरोपीचा माग घेण्यास सुरुवात केली. तेव्हापासून आरोपी गुरुजी उर्फ ऋषी पांडे हा पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आपला मोबाईलनंबर सतत बदलून उत्तर भारतात देव दर्शनासाठी फिरू लागला. आरोपीने मध्य प्रदेशातील उज्जैन, गुजरातमधील सोरटी सोमनाथ या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. तो अयोध्येला जाण्यापूर्वीच बोरवली पोलिसांनी त्याला गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे.
बोरिवली पोलिसांनी आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. बोरिवली पोलीस आरोपीने अजून कुणाकुणाची फसवणूक केली आहे का? या संदर्भात अधिकचा तपास करत आहेत.