मुंबई : राज्यात विधासभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून राष्ट्रवादीमधील दोन्ही गटांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीकडून ३५ मतदारसंघांत एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. यामध्ये बारामती, कागल, मुंब्रा, इंदापूरमध्ये ‘हाय व्होल्टेज’ लढत होणार आहे. विधानसभेच्या २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादीने निवडणूक लढवली होती.
त्यानंतर निवडून आलेल्या आमदारांमध्ये दोन गट पडले होते. ४१ आमदारांचा मोठा गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सतेत सहभागी झाला. आता, मात्र आगामी विधासाभेसाठी दोन्ही गटाकडून प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून शरद पवार आणि अजित पवार गटाने आपली ताकद पणाला लावली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला ८७, तर अजित पवार गटाला ५२ जागां मिळाल्या आहेत.
त्यानुसार हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा अधिकाधिक वेळ एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या बारामती, इंदापूर, कागल, कळवा मुंब्रा आदी मतदारसंघांत प्रचार करण्यात जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमध्ये त्यांचे पुतणे योगेंद्र यांनी दंड थोपटले आहे. तर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात आले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची लढत होणार आहे.
तसेच कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या पराभवासाठी शरद पवार यांनी फिल्डिंग लावल्याचे दिसत आहे. त्यांनी समरजितसिंह घाटगे यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. त्याप्रमाणेच शरद पवार यांना सोडून गेलेले छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील या प्रमुख जागांसह तब्बल ३५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार आहेत. यामध्ये आता कोण बाजी मारांर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ३५ जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार
बारामती, इंदापूर, आंबेगाव, अहेरी, कागल, कळवा-मुंब्रा, हडपसर, वसमत, बडगाव शेरी, चिपळूण, शिरूर, तासगाव कवठे महाकाळ, इस्लामपूर, उदगीर, कोपरगाव, अणुशक्तीनगर, येवला, परळी, दिज्ञोंगी, श्रीवर्धन, माजलगाव, वाई, सिन्नर, अहिल्यानगर शहर, अहमदपूर, शहापूर, पिंपरी, अकोले, जुन्नर, मोहोळ, देवळाली, चंदगड, तुमसर, पुसद, पारनेर या ३५ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार एकमेकांविरुद्ध लढणार आहेत.