मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमदेवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तसेच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
उमेदवारी जाहीर उमेदवारांची नावे
अमर काळे- वर्धा
भास्करराव भगरे- दिंडोरी
सुप्रिया सुळे-बारामती
डॉ. अमोल कोल्हे-शिरुर
निलेश लंके-अहमदनगर
अमर काळे आणि निलेश लंकेंना संधी
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार अमर काळे आणि निलेश लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. निलेश लंके यांना दक्षिण अहमदनगरमधून तर अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाकडून नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात शरद पवारांनी माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. भाजपकडून केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक दिवस महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा तिढा सुरू होता. याठिकाणी अनेक इच्छुक असल्याने उमेदवार जाहीर केला जात नव्हता, परंतु शनिवारी दिंडोरी लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून भास्कर भगरे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे. सु्प्रिया सुळे यांची लढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी होणार असल्याचे मानले जात आहे. तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना शिरुरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्याशी लढत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.