मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाने राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल हे राज्यसभेचे उमेदवार असणार आहेत. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची १५ फेब्रुवारी ही शेवटची तारीख आहे. आजच भाजप, शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपकडून काँग्रेसमधून नुकतेच आलेले अशोक चव्हाण, पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे यांना तर शिवसेनेने मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे काँग्रेसने ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान प्रफुल पटेल हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ मे 2027 मध्ये संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच म्हणजेच 3 वर्षे आधीच पटेल हे राजीनामा देऊन पुन्हा अर्ज भरणार आहेत. काही तांत्रिक मुद्दे असल्याने हा निर्णय घेत आहोत, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. मात्र कार्यकाळ संपण्याच्या तब्बल 3 वर्ष आधी हा निर्णय का घेतला? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.