मुंबई : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद मिळणार नसल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात असतानाच, अखेर देवेंद्र फडणवीसांनी कारण सांगितले आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीला राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते कॅबिनेट मंत्रिपदावर ठाम होते. मात्र प्रफुल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं अडचण येत होती. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आमच्या वतीने राष्ट्रवादीला एक जागा ऑफर करण्यात आली होती. परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडून प्रफुल पटेल यांचे नाव फायनल करण्यात आले आहे. ते अगोदर मंत्री राहिले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही. अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येणार नाही. पण मला विश्वास आहे की, ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळी त्यांचा विचार होईल.
नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ
राष्ट्रपती भवनाच्या परिसरात मोठ्या थाटात एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहे. यंदा मंत्रिमंडळात अनेक नवनिर्वाचित खासदारांना संधी देण्यात आल्याचं दिसंत आहे. नरेंद्र मोदींचे नवे मंत्रिमंडळ तयार करताना महाराष्ट्रासह देशभरात प्रादेशिक आणि जातीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे समजते आहे. महाराष्ट्रातून जे मंत्री शपथ घेणार आहेत, त्यांच्यमध्ये मराठा, ओबीसी, एससी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं आहे. त्यासोबतच, प्रादेशित समतोलही साधण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, मुंबईतून पियुष गोयल तर विदर्भातून दोन खासदारांना मंत्रिपदं देण्यात आली आहेत.