मुंबई : मुंबईतून एक सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील खेरनगर येथील राम मंदिर येथे आज (दि. १२) ही घटना घडली आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. तीन ते चार तरुणांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर नेमकं कोणी आणि का गोळीबार केला, याची माहिती अद्याप समोर आली नाही.
दरम्यान, या गोळीबारात बाबा सिद्धिकी गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. बाबा सिद्दिकी यांच्यावर कोणी गोळीबार केला याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
बाबा सिद्दिकी हे राज्याचे माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी त्यांनी काँग्रेसला रामराम करून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. तर त्यांचे पुत्र झिशान सिद्दिकी हे वांद्रे पूर्व या मतदारसंघाचे आमदार आहेत. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पहिले आहे.
1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार झाले आहेत. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.
2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून बाबा सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती. सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत बाबा सिद्दीकी यांचा अशिष शेलार यांनी पराभव केला होता.