मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात आज मंगळवारपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणीस सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली. यादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पक्षांतर्गत निवडणुका झालेले पुरावे म्हणून असलेली कागदपत्रे सुरक्षित कपाटातून गायब झाल्याचा दावा आव्हाड यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
मंगळवारी उलटतपासणीत आमदार आव्हाड यांना अजित पवार गटाच्या वकिलांनी प्रश्न विचारले. यामध्ये आव्हाड यांनी हा मोठा गौप्यस्फोट केला. पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? वकिलांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना, निवडणुका झाल्या होत्या. परंतु, त्याचे पुरावे असलेली कागदपत्रे सुरक्षित कपाटातून गहाळ करण्यात आल्याचे आव्हाड म्हणाले. शिवाय दोन व्यक्तींवर कार्यालयीन आणि निवडणूक कागदपत्रांच्या कामाची जबाबदारी होती, त्या व्यक्तीच पक्ष सोडून गेल्याचेही आव्हाड यांनी सांगितले.
त्यानंतर त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचे काय केले याची माहिती नाही, असंही आव्हाड म्हणाले. खासदार शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते का? त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का? असे प्रश्न या उलट तपासणीत आव्हाडांना विचारण्यात आले. यावर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यावेळी मी स्वतः उपस्थित होतो. यावेळी अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाषणे केली, असंही आव्हाड म्हणाले.