मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिग्गज नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना विधिमंडव्याच्या समित्यांमध्ये स्थान दिले नाही. अजित पवारांनी आपल्या पक्षातील या दोन वरिष्ठ नेत्यांना डावलल्याने अनेक तर्क-वितर्काना उधाण आले असून, हा पक्षांतर्गत बदलाच्या दिशेने मोठा संकेत मानला जात आहे.
राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीतील महत्त्वाचे नेते असलेल्या भुजबळ आणि धनंजय मुंडे यांना यावेळी विधिमंडळाच्या कोणत्याही समितीत स्थान देण्यात आले नाही. हा निर्णय पक्षाच्या अंतर्गत रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ मागील काही काळापासून पक्षात नाराजी व्यक्त करत होते, तर मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि वादग्रस्त प्रकरणांमुळे पक्षावर टीका होत होती. या पार्श्वभूमीवर, या दोघांना समित्यांमधून बाजूला ठेवण्याचा निर्णय हा पक्षाच्या प्रतिमेला डाग लागू नये, या दृष्टीने घेतला असावा, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
विधिमंडळाच्या विविध समित्यांमध्ये पक्षाच्या इतर आमदारांना संधी देण्यात आली असून, अनेकांनी प्रमुख पदेही मिळवली आहेत. मात्र भुजबळ आणि मुंडे यांना संधी न देणे, हा पक्षांतर्गत बदलाचा स्पष्ट संकेत मानला जात आहे. पक्षातील गटबाजी, आगामी निवडणुकीची रणनीती आणि स्वच्छ प्रतिमेचा आग्रह या निर्णयामागे असू शकतो, अशी चर्चा अजित पवार गटात सुरू आहे.
या निर्णयामुळे विरोधकांना राष्ट्रवादीवर टीका करण्याची संधी मिळाली आहे, भुजबळ आणि मुंडे यांना वगळण्यामागे नेमका हेतू काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र हा निर्णय राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट देऊ शकतो. आगामी काळात या दोन्ही नेत्यांची भूमिका काय असेल आणि पक्षात त्याची पुढील वाटचाल कशी असेल, यावर राजकीय चर्वांना उधाण आले आहे.