मुंबई: बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत आता नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवाराची घोषणा केली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चार ते पाच जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची एकाच टप्प्यात नावे जाहीर केली जातील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, शनिवारी ३० मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची घोषणा केली. बारामती लोकसभेची उमेदवारी अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजितदादा गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीवर शिक्कामोर्तब होऊन चित्र स्पष्ट झाले आहे.
माजी मंत्री विजय शिवतारे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे आता बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट सामना होणार आहे. दोन्ही उमेदवारांनी फार पूर्वीपासूनच बारामतीमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. मात्र, या दोघींनाही शनिवारी पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून शनिवारी लोकसभेच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली. वर्धा लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार अमर काळे, दिंडोरीतून भास्कराव भगरे, बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे, शिरुरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अहमदनगरमधून माजी आमदार निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार घोषित करताच काहीवेळातच खासदार सुनील तटकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.