मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला देण्याचा मोठा निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने थेट मुंबईतील बॅलार्ड पिअर भागातील ‘राष्ट्रवादी भवन’ या पक्षाच्या मुख्यालयावरच दावा केला आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बँक खाती देखील त्यांनी ताब्यात घेतली आहेत. यामुळे शरद पवारांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल येण्यापूर्वीच अजित पवारांच्या गटाने मुंबईतील पक्ष कार्यालय आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. आता या कार्यालयावर त्यांनी अधिकृतपणे दावा केला आहे. त्यामुळे राज्य सरकार अजित पवार यांचा हा दावा मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालये ही राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टची मालमत्ता असल्याचा दावा हा सातत्याने शरद पवार यांच्या गटाकडून करण्यात येत होता. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यालय हे वेल्फेअर ट्रस्टचे नसून ते पक्षाच्या मालकीचे असल्याचा दावा हा अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळेच आगामी काळात पक्ष कार्यालय नेमकं कोणाला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय हे मंत्रालयच्या जवळ होते. मात्र, साधारण 2015 मध्ये मुंबईतील मेट्रोच्या कामामुळे राष्ट्रवादीचे हे कार्यालय पाडण्यात आले. त्याऐवजी मुंबईतील बॅलार्ड पिअर परिसरात राज्य सरकारच्या वतीने त्यांना नवीन कार्यालय देण्यात आले होते. मात्र, सध्या हेही कार्यालय देखील शरद पवार यांना गमवावे लागू शकते.
यावर शरद पवार यांच्याकडे दोन पर्याय आहेत. त्यातील पहिला पर्याय म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती अर्ज करत राष्ट्रवादी काँग्रेसचे जे बॅलार्ड पिअर येथे कार्यालय आहे ते आपल्याकडेच राहावे अशी विनंती शरद पवार गटाला मुख्यमंत्र्यांना करावी लागेल. तसेच दुसरा पर्याय म्हणजे राज्य सरकारकडून दुसऱ्या कार्यालयाची मागणी शरद पवार यांना करावी लागेल.
जर अजित पवार गटाचा दावा राज्य सरकारने मान्य केला तर सध्या अस्तित्वात असलेल्या पक्ष कार्यालयाचा ताबा शरद पवार गटाला सोडावा लागेल. जो त्यांच्यासाठी एक मोठा धक्का असेल.