मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले होते. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची बैठक सुरू होती. त्याच दरम्यान मलिकदेखील दाखल झाले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची बैठक झाली. यात सुनिल तटकरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विधीमंडळ हिवाळी अधिवेशनात मलिक यांची हजेरी चर्चेचा विषय बनली होती. त्यांनी दोन दिवस हजेरी लावली होती. त्यातही ते सत्ताधारी बाकांवर बसले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मलिक यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्याचे कृत्य देशद्रोही असल्याचे म्हणत त्यांच्या अटकेच्या कारवाईचे समर्थन केले होते. तर, शिवसेनेत फूट पाडल्यानंतर शिंदे गटानेदेखील उद्धव ठाकरे यांनी मलिकांबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते.
फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीनं मनी लाँड्रिंग कायद्याखाली नवाब मलिक यांना अटक केली होती. त्यानंतर नवा मलिकांनी प्रकृती अस्वास्थतेचं कारण देत अनेकदा जामीनासाठी अर्ज केला होता. गेल्या वर्षभरापासून नवाब मलिक कोर्टाच्या परवानगीनं कुर्ल्यातील खासगी रूग्णालयात उपचार घेत होते. मलिकांनी बऱ्याचदा जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा जामीन अर्ज वारंवार फेटाळण्यात आला होता. अखेर 11 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयानं मलिकांना मोठा दिलासा देत, वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर केला होता.आज त्याप्रकरणी सुनावणी झाली आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देत नवाब मलिकांच्या जामीनाला मुदतवाढ दिली आहे.