Navi Mumbai Metro : नवी मुंबई : मुंबई, नागपूर, पुणे नंतर आता नवी मुंबईत मेट्रो धावायला सुरूवात झाली आहे. नवी मुंबईकरांना बऱ्याच वर्षांपासून प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर सुरु झाली आहे. गुरुवार 16 नोव्हेंबर रोजी मेट्रो सेवा सुरु करण्यात आली. आज शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंधार स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली. नवी मुंबईच्या अंतर्गत भागामध्ये ही मेट्रो धावणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा तळोजा भागात राहणाऱ्या लोकांना होणार आहे.
1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. ही मेट्रो सुरु होण्याकरिता काही केल्या मुहूर्त लागत नव्हता.
मेट्रोची स्थानके
नवी मुंबईच्या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे या मार्गाचा खारघरसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे.
तिकीटाचे दर
दोन किमीच्या टप्प्याकरिता 10 रुपये, 2-4 किमीकरिता 15 रुपये, 4-6 किमीकरिता 20 रुपये, 6-8 किमीकरिता 25 रुपये, 8-10 किमीकरिता 30 रुपये आणि 10 किमीपुढील अंतराकरिता 40 रुपये तिकीट दर आहेत.
पहिली आणि शेवटची मेट्रो कधी धावणार?
सकाळी 6 वाजता पहिली मेट्रो धावणार आहे. रात्री 10 वाजता शेवटची फेरी असणार आहे. प्रत्येकी 10 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.
मेट्रोची वैशिष्ट्ये?
अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रोच्या दोन्ही बाजूंना एन्ट्री आणि एक्झिट व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पार्किंगसाठी जागा, फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची डीजी व्यवस्था, ऑटो रिक्षांकरिता जागा, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.