Navi Mumbai Crime : नवी मुंबई : नवी मुंबईत आयएएस अधिकाऱ्याने एअरटेलच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन एअरटेल कर्मचाऱ्यांना पाईपने इतकी मारहाण केली की, त्यांच्या अंगावर वळ उठले आहेत. आठवडाभरानंतरही कारवाई न झाल्याने तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली आहे. घणसोली इथं हा प्रकार घडला. अमन मित्तल अस त्या आयएएसच नाव आहे.
दोघांकर्मचाऱ्यांनी अमन मित्तल आणि त्याचा भावाविरोधात तक्रार दिली आहे. मारहाण झालेल्या तरुणांनी पत्रकार परिषद घेत आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे याप्रकरणाची आता सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे.आयएएस अमन मित्तल हे मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत आहेत. मित्तल हे त्यांचा भाऊ देवेश मित्तल यांच्या घरी असताना त्यांनी एअरटेलचे वायफाय कनेक्शन लावले होते. मात्र ते सुरु होत नसल्याने त्यांनी याची तक्रार केली. तक्रारीनंतर पुन्हा दोन कर्मचारी वायफायचे कनेक्शन तपासण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. या हाणामारीत एअरटेल कर्मचाऱ्यांच्या हात, पाय आणि पाठीवर मारहाणीचे वळ उठले आहेत. सागर मांढरे आणि भूषण असे मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत.
आमच्या मोबाईल मधून जबरदस्तीने त्यांचा यूपीआय आयडी टाकून आयएएस अधिकारी अमन मित्तल यांनी आमच्या बँक खात्यातून पैसे स्वतःच्या बँकेत वळते केल्याचाही गंभीर आरोप या तरुणांनी केला आहे. त्यामुळे आयएएस अधिकारी अमन मित्तल यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.दुसरीकडे, आयएएस अमन मित्तल यांनी देखील एअरटेलचे कर्मचारी सागर मांढरे आणि भूषण गुजर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. रबाळे पोलिसांनी दोन्हीही तक्रारींची दखल घेत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करण्यात येत असल्याचे सांगितले.