नवी दिल्ली: देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातसुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असल्याने येथे भाजपने चांगलेच लक्ष घातले आहे.
अशातच मूड ऑफ द नेशन सर्वेक्षणात महाराष्ट्राची आकडेवारी समोर येत आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीने भाजप-शिंदे-अजित पवार गटावर मात केल्याचे दिसत आहे. मूड ऑफ द नेशनच्या सर्वेक्षणात महाविकास आघाडीला 48 पैकी 26 जागा मिळताना दिसत आहेत. तसेच महायुतीला 40.5 टक्के मते मिळतात. तर काँग्रेस आघाडीला 44.5 टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे. सर्वेक्षणानुसार, आज भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांची युती एकत्र निवडणूक लढवल्यास त्यांना 40.5 टक्के मते मिळतील.
कोणत्या पक्षाला किती जागा?
महाराष्ट्राच्या 48 सदस्यीय लोकसभेत भाजपला 16 जागा, काँग्रेसला 12 जागा, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) 14 जागा मिळतात. त्याचवेळी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) यांना 6 जागा मिळताना दिसत आहेत. येथे मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र येऊन भाजपला विशेष फायदा होताना दिसत नाही. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर महायुतीला 40.5 टक्के, महाविकास आघाडीला 44.5 टक्के तर इतरांना 15 टक्के मते मिळत आहेत.