मुंबई: मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांतील जागावाटपावरून महाविकास आघाडीतील तिढा कायम आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांची पुन्हा बैठक झाली. मात्र, या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही.
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची मुंबईतील जागा वाटपाबाबत बुधवारी हॉटेल सोफीटेल येथे बैठक झाली. यात यात महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने जास्तीच्या जागेसाठी आपली मागणी कायम ठेवली. शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत किमान १८ जागा हव्या आहेत, तर काँग्रेसला किमान १५ जागा हव्या आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटानेही ७ जागांची मागणी केली आहे.
याशिवाय, इंडिया आघाडीतील मित्रपक्ष समाजवादी पक्षालाही मानखुर्द शिवाजीनगर ही एक जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटाने १५, काँग्रेसने १४, शरद पवार गटाने ६, तर एक जागा समाजवादी पक्षाला सोडावी, असा आघाडीतील एका ज्येष्ठ व प्रमुख नेत्याने फॉर्म्युला दिल्याची माहिती आहे. मात्र, शिवसेना उद्धव ठाकरे गट या फॉर्म्युल्यावर तयार नसल्याची माहिती आहे. ठाकरे गटाला मुंबईतील ३६ पैकी किमान १८ म्हणजेच एकूण जागांच्या ५० टक्के जागा हव्या आहेत.
शिवसेना ठाकरे गट नमते घेत नसल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड हे गुरुवारी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यातील सर्व जागावाटप महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बसून, संबंधित त्या त्या मतदारसंघातील पक्षांची संघटनात्मक ताकद, जिंकणारा उमेदवार हाच निकष आणि विरोधक महायुतीची रणनीती आणि त्यांचा उमेदवार हे सर्व पाहूनच निर्णय घ्यावा, जागावाटप फॉर्म्युला तयार करावा.
त्यानंतरही काही जामावर वाद राहिला, तर तो वरिष्ठ पातळीवर सोडवला जाईल. मात्र, सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या व मित्रपक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून सोडवावा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी केल्याचे समजते. सध्या महाविकास आघाडीत मुंबईतील २८ ते २९ जागांवर सहमती झाली आहे. मात्र, ७ ते ८ जागांवर आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा केल्याने जागावाटप स्थिती जैसे थे आहे. मुंबईतील जागावाटपाचे घोडे पुढे सरकत नसल्याने महाविकास आघाडीचे नेते आता राज्यातील उर्वरित जागा वाटपावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तर, मुंबईतील उरलेल्या वादाच्या जागेवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हायकमांड यांच्या दरबारातच निर्णय होण्याची शक्यता आहे.