मुंबई: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी घडामोड घडली आहे. त्यामुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणेंची चौकशी होणार आहे. राणे यांनीच दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी काही दिवसांपूर्वी केली होती.
बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा आमदार राणे यांनी केला होता. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात त्यांनी केली होती. तसेच दिशा सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे देखील असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला होता. त्यामुळे आता मुंबई पोलिसांनी आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. त्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून झाला. याची सर्व माहिती माझ्याकडे उपलब्ध आहेत. मी पोलिसांना सर्व माहिती देण्यासाठी तयार आहे. मी मुंबई पोलीस आणि एसआयटीसमोर सर्व पुरावे सादर करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे आता मुंबई पोलीस आमदार नितेश राणेंची चौकशी करणार असून यामध्ये काय महत्त्वाची माहिती समोर येणार? राणे काय पुरावे सादर करणार? हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे.