Mumbai News: मुंबई : महाराष्ट्र विधानभवन परिसरात बुधवारी 11 मार्च रोजी एका व्यक्तीने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. ही घटना राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान घडल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, दादासो बबन कलसैत (वय 38, रा. टाकळी, ता. माढा) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने मुंबईतील उषा मेहता चौक परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र तेथील पोलिस आणि अधिकाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करत हा प्रकार थांबवला. त्यानंतर कलसैत याला मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहार समाजाच्या जमिनीवर उभारण्यात आलेला विश्वकर्मा यांचा पुतळा काही दिवसांपूर्वी नगर पंचायतीने हटवला होता. या घटनेमुळे तो नाराज असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध बीएनएस कलम 226 अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.







