मुंबई : मुंबईतल्या भांडूपमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. खेळता खेळाता गटारामध्ये पडून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैंवी घटना समोर आली आहे. या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यामध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी घडली आहे. या घटनेमुळे भांडुप परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
कृष्णा ओमप्रकाश गुप्ता असे या चिमुकल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांडूप परिसरामध्ये रविवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी दीड वर्षांचा कृष्णा गुप्ता हा आपल्या घरासमोर खेळत होता. त्यावेळी खेळता खेळता अचानक तो झाकण नसलेल्या गटाराजवळ आला आणि त्यामध्ये पडला. दरम्यान, यावेळी घरांच्यांनी तो दिसला नाही, म्हणून परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यानंतर साधारण एक ते दीड तासाने त्याचा मृतदेह हा गटारामध्ये सापडला. गटारात पडल्यानंतर त्याचा बुडून मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी भांडुप पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घेतली आहे.