Mumbai Local : आज कालच्या तरुण पिढीला रील बनवण्याचं चांगलंच वेड लागलं आहे. काही दिवसापूर्वी मुंबई लोकलमध्ये एका मुलीने होमगार्डसोबत रील बनवलं आणि ते सोशल मीडियावर शेअर केलं. या व्हिडीओमध्ये तरुणीसोबत होमगार्ड थिरकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. मात्र, वर्दीमध्ये डान्स करणं होमगार्डला चांगलंच महागात पडलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपी) ट्वीट करत दिली आहे.
मध्य रेल्वेच्या लोकलच्या द्वितीय श्रेणीच्या महिल्या डब्यात 6 डिसेंबर 2023 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली असून एस.एफ, गुप्ता असं होम गार्डचं नाव आहे. तरुणी तिच्या आईसोबत चिंचपोकळी ते सॅन्डहर्स्ट रोड असा प्रवास करत होती. यावेळी महिलांच्या डब्यात सुरक्षेसाठी होमगार्ड देखील होतं.
नेमकं काय घडलं?
एक तरुणी लोकल ट्रेनमध्ये रील बनवत होती. रीलसाठी तिनं महिलांच्या डब्यात डान्स करायला सुरुवात केली. आणि तिची आई तिचा रील व्हिडीओ शूट करत होती. यावेळी एक होमगार्डही तिथे उभा होता. थोडावेळ तिचा डान्स पाहिल्यानंतर होमगार्डमधला डान्सर जागा झाला आणि त्यानेही तिच्यासोबत डान्स करायला सुरुवात केली. पण वर्दीमध्ये तरुणीसोबत डान्स करणं होमगार्डला चांगलच महागात पडलं आहे. लोहमार्ग पोलिसांनी (जीआरपीने) कसुरी (डिफॉल्ट रिपोर्ट) अहवाल पाठवला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एस.एफ. गुप्ता या होम गार्डवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक ६/१२/२०२३ रोजी लोकल ट्रेन पेट्रोलिंग दरम्यान एक होमगार्ड गणवेशात नृत्य करत असल्याची व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन व सत्यता पडताळून, संबंधित होमगार्ड यांच्यावर योग्यती कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता दक्षता घेत आहोत.— GRP Mumbai (@grpmumbai) December 12, 2023