मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दिवस अगदी तोंडावर आला आहे. निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु झाला आहे. अशातच मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरी आणि अंधेरी येथे जोरदार राडा झाला. शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटांकडून करण्यात आला. यावेळी जोगेश्वरीत शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना वस्तूंचे वाटप करत असल्याचे वृत्त मतदारसंघात पसरले होते. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जाब विचारायला गेले होते. यावेळी दोन्ही बाजूचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने राडा झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. यावेळी वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या आतून दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यामुळे मातोश्री क्लबच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. जोगेश्वरीत गोंधळ सुरु असताना याठिकाणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर सुद्धा उपस्थित होते. ते देखील शिवसैनिकांबरोबर राड्यात आघाडीवर दिसले.
दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक फ्लाईंग स्क्वाड आणि पोलीसांकडे तक्रार करत शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या भेटवस्तू जप्त केल्या आहेत. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गावदेवी डोंगर परिसरात मतदारांना भेटवस्तू वाटण्यासाठी हा ट्रक आला होता. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भेटवस्तू वाटपाचा हा कार्यक्रम उधळून लावला. या घटनेमुळे मुंबईमध्ये मध्यरात्री वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले.