मुंबई : येथे काल सोमवारी घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे मोठा अपघात झाला. त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे.त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यानंतर आता या होर्डिंगबाबत काही गोष्टी समोर आल्या आहेत.
लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या होर्डिंगची नोंद होती. हे होर्डिंग रेल्वेच्या हद्दीमध्ये होते. त्या होर्डिंगला महापालिकेची परवानगी नव्हती. या अनधिकृत होर्डिंगवरील जाहिराती दिसण्यासाठी पूर्व द्रुतगती मार्गावरील झाडांवर देखील विषप्रयोग करण्यात आला होता. या प्रकरणी उद्यान विभागाच्या तक्रारीनंतर पंतनगर पोलिसांनी 24 फेब्रुवारीला अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता.
मुंबई महापालिकेने होर्डिंग लावणा-या एजन्सीला नोटीस पाठवली आहे. पालिकेकडून कमाल 40 बाय 40 चौरस फुटांच्या होर्डिंगला परवानगी देण्यात येते. पण कोसळलेलं होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटाचं होतं. त्याचा एकूण आकार 15 हजार चौरस फूट इतका होता.
मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, हे होर्डिंग उभारण्यासाठी महापालिकेकडून संबंधितांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. हे होर्डिंग जीआरपीच्या जागेवर उभारण्यात आलं होतं. या होर्डिंगबाबत संबंधित व्यक्तींनी जीआरपीला माहिती दिली होती, असा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे.