मुंबई: मुंबई महानगरपालिका (Mumbai Election) निवडणुकीत पक्ष फुटलेला असताना, माजी नगरसेवकांनी साथ सोडलेली असताना आणि अनेक पदाधिकारी फोडले गेले असतानाही (Sushma Andhare) ठाकरे बंधूंनी भाजप-महायुतीला जबरदस्त टक्कर दिली. शिवाजी पार्कवरील सभेत मुंबई “कशी विकली जात आहे” याचा मुद्दा (Udhhav Thackeray) मांडत उद्धव आणि राज ठाकरे यांनी मराठी मनाला थेट साद घातली आणि त्या एका सभेनंतर संपूर्ण प्रचाराचं वातावरणच बदलून गेलं. (Latest Marathi News)

मराठीबहुल भागांमध्ये ठाकरे बंधूंना मोठं यश मिळालं. धारावीसारखा भागही ठाकरेंसोबत ठाम उभा राहिला. मात्र उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांचा मोठा कल भाजपकडे गेल्यामुळे ठाकरे सत्तेपासून थोडक्यात दूर राहिले. महायुतीला 118 जागांवर विजय मिळाला असला तरी हे बहुमत काठावरचं आहे. ठाकरे गटाकडे 71 जागा आहेत, तर काँग्रेसनेही 24 जागा जिंकत चांगली कामगिरी केली आहे.
या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये अमराठी नगरसेवकांचा मोठा भरणा असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी भाजपच्या विजयाला “अश्वत्थाम्याची न भरणारी जखम” अशी उपमा दिली आहे.
सुषमा अंधारे म्हणतात, “फडणवीस जर खरंच चाणक्य असते, तर आतापर्यंत महापौरपदाचा उमेदवार जाहीर झाला असता. पण मुंबईत भाजपला अजूनही एकहाती शतक गाठता आलेलं नाही. 84 ची संख्या फक्त पाचने वाढली आहे. त्यातले 35 बाहेरून आलेले, 37 अमराठी आणि उरलेले आमदार-खासदारांचे नातलग आहेत.”
त्यांनी पुढे म्हटलं की, “फडणवीसांनी आपल्या सत्ताकांक्षेसाठी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला. पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार सगळं गेलं तरी ठाकरे खचले नाहीत. लोकसभेत 9 खासदार, विधानसभेत 20 आमदार आणि मुंबईत 65 नगरसेवक निवडून आणले. ठाकरे कुठेही ईडी, सीबीआय किंवा निवडणूक आयोगाच्या मागे लपले नाहीत. निधड्या छातीने लढले.”
मुंबईच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी मैदान सोडलं नाही, हेच या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. महायुतीला सत्ता मिळाली असली तरी ठाकरे अजूनही मुंबईच्या राजकारणात मोठी ताकद आहेत, हे या निवडणुकीनं ठसठशीतपणे दाखवून दिलं आहे.






