मुंबई : मुंबईतील पवईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एअर इंडियाच्या तरुण महिला पायलटचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तरुणीच्या बॉयफ्रेंडला ताब्यात घेतले आहे.
सृष्टि तुली (वय-25) असे पायलट तरुणीचे नाव आहे. पवई पोलिसांनी (मंगळवारी 26 नोव्हेंबर) रोजी सृष्टीचा प्रियकर आदित्य पंडित (वय-27) याला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी आणि आदित्य दोघेही कमर्शियल पायलट लायसन्स (सीपीएल) प्रशिक्षणादरम्यान दिल्लीत भेटले होते. आदित्य पंडीत आणि सृष्टी दोघे रिलेशनमध्ये होते. आदित्य सतत सृष्टीला टॉर्चर करायचा. अगदी छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात वाद व्हायचे. आदित्य हा वारंवार तिच्याशी गैरवर्तन करायचा. आदित्यच्या छळामुळे ती त्रस्त होती. एवढंच नव्हे तर आदित्यने सृष्टीला 12 दिवसांसाठी व्हॉट्सॲपवर ब्लॉक केलं. यामुळे सृष्टी खूप नाराज झाली. अखेर 25 नोव्हेंबरच्या रात्री तिने आदित्यला फोन केला आणि आपण आपलं आयुष्य संपवत असल्याचं त्याला सांगितलं. तिचं बोलणं ऐकून आदित्य खूप घाबरला, धावतपळत तो तिच्या फ्लॅटवर पोहोचला. पण दरवाजा आतून बंद होता. त्याने कसाबसा चावीवाला बोलावत दार उघडून घेतलं आणि आतमध्ये गेल्यावर त्याला सृष्टीचा मृतदेह पंख्यावर लटकलेला आढळला. सृष्टि तुली मुंबईतील तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली.
तसेच आदित्यने तिला नॉनव्हेज खाण्यापासूनही रोखलं असल्याचा आरोप सृष्टीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकाराला वैतागूनच सृष्टिने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. सृष्टीचा मृतदेह पोलिसांन ताब्यात घेतला असून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सृष्टीच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही तक्रार मुलीच्या काकांनी पोलिसात दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी करत आहेत.