मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा तसेच, मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका व्हावी यासाठी राज्य सरकारने केंद्राच्या मदतीने अनेक कामे सुरु केली आहेत. त्यातील एक म्हणजे कोस्टल रोड. आज गुरुवारी (ता. 12 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोस्टल रोड ते सी-लिंक मार्गाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे मरीन ड्राइव्ह ते वांद्रे हा प्रवास आता 12 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
कोस्टल रोड ते सी-लिंक मार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिपक केसकर, तसेच मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत.
कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सीलिंकपर्यंत आहे. या मार्गाची लांबी 10.58 किमी असून प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मिळत आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे.
या प्रकल्पामुळे आता कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे जोडला गेल्याने वांद्रयाहून दक्षिण मुंबईत प्रवास वेगाने करता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी अपेक्षा आहे.