मुंबई : येथील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कोस्टल रोडची पाहणी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एका विशेष व्हिंटेज कारमधून मुंबईतील कोस्टल रोडवरून एकत्रित प्रवास करत या बोगद्याची पाहणी केली आहे. यावेळी एकनाथ शिंदे पुढच्या सीटवर, तर देवेंद्र फडणवीस, अजित पवार मागच्या सीटवर बसलेले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर मुंबईतील कोस्टल रोडचे आज उद्धाटन करण्यात आले. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटे लागणार आहेत. यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे .
मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प हा दोन भागांत विभागला गेला आहे. दक्षिण भाग आणि उत्तर भाग असे हे दोन भाग आहेत. यामध्ये दक्षिण भागाचे काम आधी हाती घेण्यात आले आहे. मुंबई ते कांदिवली दरम्यान जवळपास 29 किलोमीटरचा हा कोस्टल रोड प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल प्रकल्प हा साडेदहा किलोमीटरचा आहे जो मरीन ड्राईव्हच्या प्रिन्सेस स्ट्रीट फ्लाओवर पासून सुरू होतो ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंत आहे.
दरम्यान, हा बोगदा सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत असे 16 तास खुला ठेवला जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी हा बोगदा बंद ठेवला जाणार आहे.