मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच मुंबईतील लोखंडवाला येथील रिया पॅलेसमध्ये आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. क्षणात या आगीने रौद्ररूप धरण केल्यामुळे यात तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
चंद्रकांत सोनी (वय 76 वर्ष), कांता सोनी (वय 71 वर्ष) आणि नोकर रवी (वय 33 वर्ष) असे या घटनेत मृत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तब्बल एका तासांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी ओशिवारा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे. आगीमध्ये परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही.