Mumbai Airport News : मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्वाधिक विमान वाहतूक हाताळणीचा विक्रम केला आहे. दिवाळीदरम्यान ११ नोव्हेंबर, २०२३ रोजी दिवसभरात १,०३२ विमानांची ये-जा या विमानतळावर झाली. याद्वारे विमानतळाने डिसेंबर २०१८चा स्वत:चाच सर्वाधिक प्रवासीसंख्येचा विक्रम मोडला. करोना संकटाआधी मुंबईचे हे विमानतळ देशात सर्वाधिक व्यग्र होते. विमानतळावरून ९ डिसेंबर, २०१८ रोजी १,००४ विमानांची विक्रमी ये-जा झाली होती. त्यानंतर मागील महिन्यापर्यंत विमानोड्डाणांची संख्या टप्प्याटप्प्याने ९३० दरम्यान पोहोचली होती. आता ऑक्टोबर २०२३ ते ३१ मार्च, २०२४ हिवाळी वेळापत्रकात दैनंदिन ९५० उड्डाणे निश्चित झाली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने ११ नोव्हेंबरला १,०३२ उड्डाणे हाताळली. याद्वारे विक्रमी १ लाख ६१ हजार ४१९ प्रवाशांनी प्रवास केला. त्यामध्ये १ लाख ७ हजार ७६५ देशांतर्गत व ५३ हजार ६८० आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता. यंदा दिवाळीच्या ११ ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसांत एकूण २,८९४ विमानोड्डाणांची हाताळणी विमानतळाने केली. त्यामध्ये २,३१७ देशांतर्गत; तर ७५७ आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश होता. या तीन दिवसांतील प्रवासीसंख्या ५ लाख १६ हजार ५६२ इतकी असून त्यामध्ये ३ लाख ५४ हजार ५४१ देशांतर्गत व १ लाख ६२ हजार २१ इतक्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश होता. दिवाळीदरम्यान (११ ते १३ नोव्हेंबर) दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई या देशांतर्गतसह दुबई, लंडन, अबुधाबी व सिंगापूर या विमानतळांसाठीच्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक होती.