Mumbai Accident : मुंबई : मुंबईतील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर मोठा अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक जखमी झाले.एका इनोव्हा गाडी चालकाने आधी मर्सिडीजला धक्का दिला. त्यानंतर टोल नाक्यावरून घाईत जाण्यासाठी टोल नाक्यावर उभ्या असलेल्या दोन ते तीन गाड्यांना त्याने मागून वेगाने जोरदार धडक दिली. यात ९ नागरिक जखमी झाले. यातील तिघांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक जखमी असून आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर वांद्रे पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मर्सिडीजसह सहा गाड्यांचं नुकसान
रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली. सी लिंकवर टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर इनोव्हा गाडी मर्सिडीज गाडीला घासून गेली. त्यानंतर इनोव्हा चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि टोल प्लाझावरून लवकर जाण्यासाठी पुढे येऊन दोन तीन गाड्यांना धडक दिली. मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. उर्वरित सहा जणांवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे, तर चार जणांची प्रकृती स्थिर आहे. भाभा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी एका रुग्णाला लिलावती रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, अशी माहिती डीसीपी उपाध्ये यांनी दिली.