मुंबई : राज्यात अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. अशातच मुंबईतील मुलुंड परिसरात कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत 13 वर्षाच्या मुलावर लैगिंक अत्याचार करण्यात आला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या 8 महिन्यांपासून हा भयानक प्रकार सुरू होता. या प्रकरणी 50 वर्षाच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दया शंकर जमीनदार राजभर (वय-50) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पीडित मुलाला घराजवळच्या सार्वजनिक शौचालयात घेऊन जायचा आणि तेथे त्याचे शोषण करायचा. एवढंच नव्हे तर या घटनेबद्दल घरात किंवा बाहेरही इतर कोणालाही काहीही सांगितलं तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जीवानिशी मारून टाकेन, अशी धमकीही त्या नराधमाने दिली होती. पीडित मुलगा आणि आरोपी एकमेकांसोबत वारंवार परिसरातील सार्वजनिक शौचालयात असल्याने शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला त्यांच्यावर संशय आला. त्याने एकेदिवशी दोघांचा पाठलाग केला असता आरोपी मुलावर अत्याचार करत असल्याचे उघड झाले. पीडिताच्या घरच्यांनी विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली. पीडित मुलाच्या वडिलांसह शेजाऱ्यांनी त्वरीत मुलुंड पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
आरोपीवर लैंगिक छळ आणि लैंगिक अत्याचाराच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलुंड पोलीस अधिक तपास करीत आहेत.