मुंबई: राज्यात लवकरच ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आज (दि. २९) विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. याबाबतची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. आमदार सरनाईक यांनी तिर्थदर्शनच्या संदर्भात लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आपला महाराष्ट्र संताची भुमी आहे. सध्या पांडुरंगाची वारी सुरु आहे. राज्य सरकारने पहिल्यांदाच 20 हजार रुपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला, असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेबाबत नियम ठरवण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. नियमावली करुन आपण दरवर्षी किती लोकांना पाठवू शकतो हे बघू. बाय रोटेशनप्रमाणे ही योजना सुलभपणे राबवता येईल, असं देखील मुख्यमंत्री म्हणाले. काही जणांची तीर्थ दर्शनाला जाण्याची इच्छा असते, पण ते लोक जाऊ शकत नाहीत, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना लागू करण्यात येईल. या योजनेचा आशिर्वाद देखील आपल्या सरकारला मिळेल. आम्ही नवीन नवीन निर्णय घेऊ, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीआज विधानसभेत लक्षवेधी मांडली होती की, जे जेष्ठ नागरिक तीर्थ क्षेत्रांना जाऊ इच्छितात, दर्शन घेऊ इच्छितात त्यांना तीर्थ ही यात्रा परवडणारी नाही. या जेष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता यावा, यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरु करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ दर्शन योजना आम्ही आज सुरु करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले. यासाठी लवकरच एक धोरण ठरवलं जाईल, शासनच्या माध्यमातून 5 ते 10 हजार लोकांना तीर्थ दर्शन घडवले जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यामध्ये सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा समावेश असेल, असंही शिंदे यांनी सांगितले.