मुंबई : रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे १७ ते २० ऑगस्ट या चार दिवसांमध्ये प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या एसटीमधून महामंडळाला १२१ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे २० ऑगस्ट या एका दिवशीच तब्बल ३५ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसांत विक्रमी उत्पन्न मिळत असते. कारण, या दिवशी भाऊ बहिणीकडे किंवा बहीण भावाकडे असे प्रवासी दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये होते. परिणामी गेली कित्येक वर्षे रक्षाबंधनच्या दिवशी एसटीला त्या वर्षातील विक्रमी उत्पन्न मिळत आले आहे. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे सोमवारी ३० कोटी व दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी तब्बल ३५ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. या दोन दिवसांत १ कोटी ६ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ५० लाख असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.