मुंबई : २८ ऑक्टोबरपासून सर्वत्र दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. रेल्वे प्रशासन, महानगरपालिका यांच्याद्वारे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट जाहीर झाली असतानाच एसटी कर्मचारी मात्र आजही दिवाळी भेटीच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच यंदाच्या दिवाळी भेटीत काहीअंशी वाढ करत कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपयांची दिवाळी भेट मिळणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून नाव न सांगण्याच्या अटीवरून देण्यात आली. यासाठी एसटी महामंडळाने शासनाकडे एकूण ६० कोटींचा प्रस्ताव पाठवला असून दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी भेट जमा होणार असल्याचे देखील यावेळी या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दिवाळी सण म्हटले की, सर्वत्र उत्साहाचे, आनंदाचे, तेजोमय वातावरण पाहायला मिळते. दिवाळी गोड व्हावी ही प्रत्येक घटकाची माफक अपेक्षा असते. यासाठी दिवाळीपूर्वी शासकीय, निमशासकीय, काही खासगी संस्थांमध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात येते. एसटी कर्मचाऱ्यांना देखील प्रतिवर्षी दिवाळी भेट वेतनासोबत देण्यात येते. मात्र यंदा दिवाळी हा सण महिनाअखेरीस म्हणजेच २८ ऑक्टोबर रोजी आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचे कारण म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा कालावधी ७ ते १० असताना वेतनापूर्वी येणाऱ्या दिवाळीमध्ये आर्थिक गाडा चालवायचा कसा? सणासाठी लागणारी खरेदी करायची कशी? असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.
कर्मचारी संघटनांकडून कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याचे तसेच उचल देण्याची मागणी महामंडळ्ळाकडे करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने देखील हालचाली सुरू केल्या आहेत. कर्मचाऱ्यांना दिवाळी सण उत्साहात साजरा करता यावा, यासाठी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वीच करण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाने राज्य सरकारकडे पाठवला आहे. त्याचबरोबर एसटी महामंडळातील कार्यरत ८७ हजार कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळावी, यासाठी तातडीने एकूण ६० कोटी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही महामंडळाने सरकारकडे केली असल्याचे एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, गतवर्षी कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये एवढी दिवाळी भेट मिळाली होती. यंदा आगामी निवडणुका, महागाई लक्षात घेत यामध्ये काहीअंशी वाढ करण्याचा निर्णय घेतला गेल्याचेदेखील यावेळी अधिकाऱ्याने सांगितले.
अर्थसंकल्पातील शिल्लक रक्कम द्या!
प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही दिवाळी सणासाठी कर्मचारी व अधिकारी यांना ‘दिवाळी भेट’ मिळावी, यासाठीच्या प्रस्तावाला महामंडळाच्या अध्यक्ष महोदयांनी १५ ऑक्टोबर रोजी आचारसंहितेपूर्वी मंजुरी दिली आहे. मात्र ही भेट दिवाळीपूर्वी मिळण्यासाठी राज्य सरकारने तरतूद केलेल्या सन २०२४ च्या अर्थसंकल्पातील शिल्लक रकमेची मागणी तत्काळ राज्य सरकारकडे करावी किंवा महामंडळाच्या दैनंदिन उत्पन्नातून सदरची रक्कम एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना वितरीत करावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.