मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीने महत्वाचा निर्णय घेतला असून, पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल केला आहे. नवी मुंबईतील पोलीस मुख्यालय येथे 15 ते 27 एप्रिल दरम्यान पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. परंतु, लोकसभा निवडणूक कार्यक्रम पाहता 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल केला आहे. त्यावेजी आता 29, 30 एप्रिल आणि 2 मी रोजी ही चाचणी होणार आहे. बाकी इतर तारखांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
याबाबत एमपीएससीकडून एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. त्यामध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा-2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा कार्यक्रम हा 15 ते 27 एप्रिल 2024 या दरम्यान आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम निश्चित करताना लोकसभा निवडणूकीतील मतदानाचे टप्पे लक्षात घेऊनच त्या-त्या टप्प्यातील उमेदवारांना अन्य दिवशी शारीरिक चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. परंतु, केंद्रीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निवेदने विचारात घेता 19, 26 आणि 27 एप्रिल 2024 रोजीच्या उमेदवारांची शारीरिक चाचणी अनुक्रमे 29, 30 एप्रिल 2024 आणि 2 मे 2024 या दिवशी नवी मुंबई येथील पोलीस मुख्यालयात घेण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित सविस्तर कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे एमपीएससीकडून सांगण्यात आले आहे.