मुंबई: नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवला आहे. त्यामुळे आता पुढील पाच वर्षे केंद्रासह राज्यात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्यात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, मुंबईमध्ये सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. लोकसभा निवडणुकीत सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते.
मात्र, आता विधानसभेच्या निकालानंतर खासदार सुरेश म्हात्रे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, खासदार सुरेश म्हात्रे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या भेटीचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. बाळ्या मामा यांनी मात्र आपण देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यानंतरही बाळ्या मामा आणि फडणवीसांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.