मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कल्याण लोकसभेच्या जागेवरून महायुतीत मोठी धुसफूस सुरु आहे. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला होता. यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा झालेली नव्हती. दरम्यान, या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याणच्या जागेवर खासदार श्रीकांत शिंदे हेच महायुतीकडून उमेदवार असतील, असं फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेमुळे आता कल्याण भाजपचे स्थानिक नेतृत्व काय भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ठाणे आणि कल्याण भाजपच्या नेत्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या सर्व नेत्यांनी आपली नाराजी फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली होती. विशेष म्हणेज जर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या प्रचाराचे काम करणार नाही, असा टोकाचा निर्णयही आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर आता खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे