मुंबई : जेष्ठ मराठी लेखिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या मातोश्री वीणा देव यांचे निधन झाले आहे. त्या 76 वर्षाच्या होत्या. मंगळवार 29 ऑक्टोबर रोजी वीणा देव यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी “मानसी” सहकारनगर येथे आणण्यात आले. वीणा देव यांच्या मागे दोन कन्या मृणाल आणि मधुरा, जावई, नातू, नातसून असा परिवार आहे.
वीणा देव यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि गो.नी.दांडेकर यांच्या त्या कन्या होत्या. वीणा देव यांच्या साहित्याचं साहित्यप्रेमींकडून कायमच कौतुक होत आलं आहे. इतकच नव्हे तर त्यांनी सुमारे 32 वर्षे अध्यापनाचं काम केलं. वीणा देव यांचे प्राध्यापक विजय देव यांच्यासोबत लग्न झाले होते.
वीणा देव यांच्या प्रवासाविषयी..
डॉ.वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत्या. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केलं. तिथेच त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचं कार्य सुद्धा केलं. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.
वीणा देव यांची साहित्य संपदा..
‘परतोनी पाहे’, ‘कधीकधी’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ हे त्यांचे लेखनसाहित्य प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन पुस्तकं आहेत. तसेच त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत.