मुंबई: कुख्यात गुंड अरूण गवळी केस संदर्भातली एक फाईल गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्ट अर्थात ‘मोक्का’ लागू करण्यासंदर्भातली फाईल गहाळ झाल्याची माहिती गुन्हे शाखेने मुंबई सत्र न्यायालयाला दिली आहे. शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरूण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या अरूण गवळी जामिनावर आहे. आर्थिक लाभ, खंडणी आणि २००५ मध्ये मुंबई, ठाणे, कल्याण येथील मालमत्ता हडप करण्यासाठी गवळी याने काही लोकांना धमकावल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
दरम्यान एका खंडणी प्रकरणात उलट तपासणीसाठी अरूण गवळीच्या वकिलांना काही कागदपत्रे मागितली होती. त्यावेळी विशेष सरकारी वकिलांनी २०१३ मध्ये मुंबईत पूर आल्यामुळे जी फाईल ठेवली होती, ती सापडत नसल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने गेल्याच महिन्यात मुंबई पोलिसांना चांगलेच खडे बोल सुनावले होते. तसेच कोणताही आधार नसलेल्या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केले होते. तसेच दहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या खटल्याला आणखी किती काळ उशीर करायचा? असाही प्रश्न देखील न्यायालयाने उपस्थित केला होता. कागदपत्रे सादर करण्यात आणखी किती वेळ लागेल, ती मुदत सांगा असंही न्यायालयाने विचारले होते. आता या प्रकरणातली महत्त्वाची फाईलच गहाळ झाली आहे, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली आहे. याबाबत हिंदुस्थान टाइम्सने वृत्त दिले आहे.