मुंबई: विधानसभा निवडणुकीत आपण महायुतीसोबत जायला हवे होते. महायुतीसोबत गेलो असतो, तर चित्र वेगळे असते. यापुढे तरी महायुतीत सामील झाले पाहिजे, असा सूर मनसेच्या चिंतन बैठकीत प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासमोर लावून धरल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभेतील पक्षाच्या खराब कामगिरीचा विचार करताना ‘मनसे उमेदवारांना जनतेने मते दिली. पण, मतमोजणीत ती दिसली नाहीत,’ असे सांगत ‘ईव्हीएम’वर शंका उपस्थित केल्या. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी सोमवारी सकाळी ११ वाजता पक्षाच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची व पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली.
त्यावेळी राज यांनी पदाधिकाऱ्यांकडून निवडणुकीतील अनुभव विचारले. पक्षाला कशामुळे अपयश आले, याचीही विचारणा केली. त्यावेळी उमेदवारांनी आपापले अनुभव सांगितले. काही उमेदवार म्हणाले की, आम्ही ज्या भागात राहतो, त्या भागातील मतदान केंद्रात घरातील लोकांचीही मते मला मिळाली नाहीत. माझ्या घरातच जर १०-१२ मते असतील, तर मला त्या मतदान केंद्रावर २-३ मतेच कशी मिळू शकतात ? असे असेल, तर जनतेने दिलेले मत आपल्याला कसे मिळेल? आपण लोकसभेला भाजप-महायुतीला मदत केली; पण महायुतीच्या नेत्यांची आपल्याला कुठेही मदत झालेली नाही.
आपण महायुतीत थेट सामील नसल्याने आपल्याला महायुतीच्या नेत्यांनी सहकार्य केले नाही. जर आपण महायुतीत थेट सामील असतो, तर चित्र वेगळे असते. आपण महायुतीसोबत जायला हवे होते. आता भविष्यात तरी आपण महायुतीसोबत जायला हवे, असा सूर काही उमेदवारांसह प्रमुख नेत्यांनी लावून धरला. राज ठाकरे यांनी सर्वांचे म्हणणे एकूण घेतले. त्यामुळे आता राज ठाकरे येणाऱ्या काळात काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्वाचे आहे.