मुंबई: मनोज जरांगे पाटील यांना भेटून सांगितलं होतं की, असं कोणतंच आरक्षण कधीही मिळणार नाही. मुळात त्यांच्या मागे कोण आहे, कोण बोलायला लावत आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय निर्माण तणाव होत आहेत, हे लवकरच समोर येईल, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयावर आपली रोखठोक मत मांडली. राज्य सरकारवरही त्यांनी टीकेची तोफ डागली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला.
राज ठाकरे म्हणाले, जात ही गोष्ट अनेकांना प्रिय असते, स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असणे हे स्वाभाविक आहे, पण दुसऱ्याच्या जाती बद्दल द्वेष निर्माण करणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात सुरू झाले. या लोकांच्या स्वार्थापायी आपण महाराष्ट्र खड्ड्यात घालतोय. माझ्यासाठी माणूस महत्त्वाचा, मी जात पात मानत नाही, फक्त माणसाला महत्त्व देतो, असे म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्षाने मतदारांना मोफत आयोध्यावारी घडवण्याचे अश्वासन दिले. त्यावरुन राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, भाजप टूर अँड ट्रॅव्हल्स नावाने नवीन खाते उघडणार असे वाटत आहे. त्यांनी तिथे इतके वर्ष जे काम केले त्यावर निवडणुका लढवायला हव्यात’, असं देखील ठाकरे म्हणाले.