मुंबई : हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याने सत्ताधारी पक्षातील इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे रीघ लागली आहे. मात्र संभाव्य मंत्र्यांची यादी भाजप पक्षश्रेष्ठींच्या मान्यतेसाठी दिल्लीला पाठवण्यात येणार असून तिथून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्य सरकारचे येत्या १६ डिसेंबरपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. मात्र महायुतीतला खातेवाटपाचा वाद अद्याप मिटलेला नाही. महसूल, गृह आणि नगरविकास खात्यांवर शिवसेना अडून आहे. त्यावर दिल्लीतून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गृहमंत्रीपदाबाबतचा निर्णयही दिल्ली दरबारातूनच होणार आहे, असे भाजपमधून सांगितले जाते.
राज्याच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपला १५, शिवसेनेला १०, तर राष्ट्रवादीला ७ खाती मिळतील, अशी चर्चा आहे. या मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळावी, यासाठी तिन्ही पक्षांतील इच्छुकांनी जोर लावला आहे, परंतु वादग्रस्त विधाने करणाऱ्या, अडीच वर्षांच्या कार्यकाळात महायुतीला अडचणीत आणणाऱ्या तसेच भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या मंत्र्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश नसेल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.