मुंबई: अभिनेता सलामान खान याच्या मुंबईतील घरावर काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता. या गोळीबार घटनेची जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून बिष्णोई गँगने स्वीकारली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोघांना देखील अटक केली आहे. त्यानंतरही बिष्णोई गँगने आपले उद्योग बंद न करता मोर्चा राजकीय लोकांकडे वळवला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड या गँगच्या रडारवर आले आहेत. या गँगने आव्हाड यांना धमकी देत लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे.
अभिनेता सलमान खानचे प्रकरण शांत होत नाही, तोच आता राजकीय नेत्यांना धमक्या बिष्णोई गँगकडून दिल्या जात आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांना बिष्णोई गँगकडून धमकीचा फोन आला असून त्यांनी लाखो रुपयांची खंडणी मागितली आहे. पैसे न दिल्यास अभिनेता सलमान खान सारखे होणार असल्याचे म्हटले आहे. फोनवरती त्याने आपले नाव रोहित गोदारा असे सांगितले आहे. हा धमकीचा फोन ऑस्ट्रेलियामधून आला आहे.
दरम्यान या प्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. मुंबई पोलीस अभिनेता सलमान खान प्रकरणासारखे या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शोधून बेड्या ठोकतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.