मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. बावनकुळे यांच्या मुंबईतील बंगल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास दोघांची भेट झाली. दोघांमध्ये साधारण तासभर चर्चा झाली. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने ही भेट घडवून आणल्याचे देखील सूत्रांच्या हवाल्याने टीव्ही9 मराठीने वृत्त दिले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. जयंत पाटील यांच्या मनात पक्षबदलाचा विचार सुरू असल्याचे सांगतानाच याच कारणातून त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघा नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. या चर्चेवेळी भाजपचे ज्येष्ठ मंत्रीही बैठकीला उपस्थित होते
विशेष गोष्ट म्हणजे, गेल्या आठवड्यात जयंत पाटील यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. त्यावेळी जयंत पाटील यांनी महाराष्ट्राची उदात्त राजकीय संस्कृती विषद करीत नितीन गडकरी राष्ट्रवादीत येणार, असे म्हणू नका, अशी टोलेबाजी यावेळी केली होती.







