महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार बच्चू कडू लवकरच महायुतीतून बाहेर पडणार असल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू तिसरी आघाडी काढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना आणि आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेपुढे मोठा पर्याय ठाकणार आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्वराज्य पक्ष आणि प्रहार संघटना एकत्र विधानसभा निवडणुका लढण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची अधिकृत घोषणा 9 ऑगस्टला करण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांची महाराष्ट्रात एक वेगळी ओळख आहे.
बच्चू कडू अनेकदा शेतकरी, कष्टकरींच्या प्रश्नांसाठी विधानसभेच्या सभागृहात आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. तसेच संभाजीराजे देखील कोल्हापूर गादीचे वंशज असल्याने त्यांच्याबद्दल तरुणांच्या मनात एक वेगळा आदर आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांना आगामी विधानसभेत आपापल्या प्रतिमेचा चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.