मुंबई: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या मोठा दणका दिला आहे. त्यांच्याकडून मुख्य प्रवक्तेपद हे अवघ्या सहा महिन्यांच्या आत काढून घेण्यात आलं आहे. आता त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी कॉंगेस पक्षात दोन गट पडल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यावेळी त्या गटाच्या पहिल्या बैठकीत आमदार अमोल मिटकरी यांची पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या अजित पवार गटाचे एकूण सात प्रवक्ते आहेत. त्यानंतर आता अमोल मिटकरींना मुख्य प्रवक्तेपदावरून दूर करून त्या ठिकाणी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अमोल मिटकरी काय म्हणाले ?
पक्षाच्या या निर्णयानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मला पक्षाने दणका वगैरे काही दिला नाही. मागच्या वेळी प्रवक्ता म्हणून माझ्या नावाची घोषणा पक्षाकडून करण्यात आली होती. पक्षाचे एकूण सात प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहेत. मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा, मी अकोल्यात राहतो. त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे अभिनंदन, असंही मिटकरी म्हणाले.