पालघर : पालघरमधील वसईत एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. एका कंपनीमध्ये अज्ञात व्यक्तीने एका महिलेच्या पिण्याच्या बॉटलमध्ये युरिन टाकलं होतं. त्यातील एका महिलेने पाणी समजून ते चुकून प्यायल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. त्यानंतर कंपनीमधील तिन्ही मुलींनी थेट माणिकपूर पोलीस स्टेशन गाठलं. फिर्यादिनी आपली लेखी तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वसई पूर्वेला इंमिटेशन ज्वेलरी बनवणाऱ्या विशाल 110 या कंपनीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीत मुक्ती बरुड, प्रिती गायकर आणि रेखा जाधव या तीनच मुली कार्यरत आहेत. संध्याकाळच्या वेळी या कंपनीत दुसऱ्या कंपनीतील चार कामगार झोपण्यासाठी येतात.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी कंपनीत आल्यानंतर त्यातील एक मुलगी पिण्याच्या बाटलीतील पाणी प्यायली. मात्र ते घाणेरडं लागून तिला किळस आल्यामुळे तिने उलटी केली. ती बाटली नीट पाहिल्यानंतर त्यामध्ये युरिन असल्याचं तिच्या लक्षात आलं. इतर दोन्हीही बाटल्यांमध्ये युरिनच ठेवण्यात आलं होतं.
मालकाकडून उलट मुलींवरच संशय
हा किळसवाना प्रकार रात्री कंपनीमध्ये झोपायला आलेल्या कामगारांनीच केल्याचा मुलींनी आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार कंपनीच्या मालकाकडे केली. मात्र, त्या मालकाने उलट त्या मुलींवरच संशय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर संतापलेल्या मुलींनी थेट वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेत आपली लेखी तक्रार दिली आहे.
आरोपींसह कंपनीच्या मालकावर देखील कारवाई करण्याची मागणी तक्रारदार मुलींनी केली आहे. माणिकपूर पोलिस या घटनेची कसुन चौकशी करत आहेत. पुढील तपास पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू माने करीत आहेत.