मुंबई : मुंबईच्या वडाळा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या १२ वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला आहे. या घटनेने वडाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वडाळ्याच्या शांतीनगर भागात ट्रक टर्मिनलजवळील संदीप उर्फ राज यादव याचा मृतदेह सापडला आहे. तो २८ जानेवारीपासून बेपत्ता होता.
महिनाभरानंतर या मुलाचा मृतदेह सापडला आहे. या मुलाचं डोकं धडापासून वेगळं करण्यात आलं आहे. वडिलांनी चपलांवरून मुलाचा मृतदेह ओळखल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वडाळा टीटी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी खारफुटीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका स्थानिक मच्छिमाराला जाहिरात बॅनरच्या फेकलेल्या रोलमधून एक हात बाहेर पडलेला दिसला. त्याने ताबडतोब पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना मुलाचा अत्यंत कुजलेला डोके नसलेला मृतदेह आढळला. तसेच एक कवटीही सापडली आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टम आणि डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. या प्रकरणी अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी रोजी मुलाच्या वडिलांनी वडाळा पोलिसांत मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. रात्री बाहेर खेळायला गेल्यानंतर मुलगा परतला नाही. मुलाचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही, अशी माहिती पोलिसांना मृत मुलाच्या वडिलांनी दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर त्यांना संदिप हा त्यांच्या शेजारी पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या बिपुल सिगरीसोबत फिरताना आढळला. दुसऱ्या दिवशी, स्थानिकांनी बिपुलला पकडलं. त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशीदरम्यान बिपुलने पोलिसांना सांगितलं की, रक्तस्त्राव होत असल्याने डोकं धुवायचं आहे. या बहाण्याने तो स्टेशनच्या बाहेर पळून गेला. शहर गुन्हे शाखेने संशयित आरोपीचा पुणे, दिल्ली आणि नंतर जम्मू-काश्मीरमध्ये माग काढला, परंतु तो सापडला नाही.