ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातील उद्यानात अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विनयभंग करणाऱ्या नराधमाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप शेळके (वय-42) असे त्या नराधमाचे नाव आहे.
दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकाच्या आणि रुग्णालयातील एमएसएफ सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे पीडित मुलीवरील अनर्थ टळला आहे. रुग्णाचे नातेवाईक आणि संपकरी डॉक्टरांनी वेळीच घटनास्थळी धाव घेत नराधमाला चांगलाच चोप दिला आहे.
नेमकं काय घडलं?
सादर 11 वर्षीय पीडित मुलगी ही आपल्या आईबरोबर सोमवारी कळवा रुग्णालयात आली होती. त्यावेळी ती रुग्णालयाच्या आवारात उभी होती. त्याचवेळी नराधम प्रदीप याने मुलीला जवळच असलेल्या उद्यानात नेले. तेथे आरोपी मुलीशी अश्लील चाळे करत होता. त्यावेळी एका रुग्णाच्या नातेवाईकाने त्याला पहिले.
दरम्यान, रुग्णालय परिसरात डाॅक्टरांचा संप सुरू होता. त्या नातेवाईकाने त्या घृणास्पद प्रकाराची माहिती संपकरी डाॅक्टरांना दिली. त्यावेळी डाॅक्टरांनी तत्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना बोलावून प्रदीप याला चांगलाच चोप दिला आणि त्याला ताब्यात घेतले. याशिवाय या प्रकाराची माहिती कळवा पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रदीपला अटक केली आहे.