मुंबई : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे ७ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात येत होते. त्यामध्ये २ रुपयांची वाढ करून ते ७ रुपये करण्यात आले आहे. दूध उत्पादकांना दूध संघांनी ३.५ फॅट/८.५ एसएनएफ या प्रतीकरिता १ ऑक्टोबर २०२४ पासून २८ रुपये प्रतिलिटर इतका दर देणे बंधनकारक आहे.
त्यानंतर दूध उत्पादकांना शासनामार्फत ७ रुपये प्रतिलिटर त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील. त्यामुळे या शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर ३५ रुपये भाव यापुढेही मिळत राहणार आहे. ही योजना १ ऑक्टोबर २०२४ पासून राबवण्यात येईल. तिचा आढावा घेऊन नंतर मुदतवाढीचा विचार करण्यात येईल. योजनेसाठी ९६५ कोटी २४ लाख इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे निर्णयात नमूद करण्यात आले आहे.