MHADA lottery : मुंबई : मुंबईत स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी म्हाडाने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने तब्बल 2640 घरांच्या विक्रीसाठी नवीन लॉटरी जाहीर केली असून याची अर्ज प्रक्रिया आता सुरू झाली आहे. विशेष म्हणजे ही घरे मुंबईतील विविध महत्त्वाच्या भागांमध्ये उपलब्ध आहेत आणि यासाठी संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे. या लॉटरीचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटांतील लोकांसाठी घरांचे पर्याय ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपल्या आर्थिक क्षमतेनुसार योग्य गट निवडून या घरांसाठी अर्ज करू शकणार आहे.

या लॉटरीसाठी पात्र ठरण्यासाठी म्हाडाने उत्पन्नाचे काही ठराविक निकष लावले आहेत. यामध्ये अर्जदाराचे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2025 या आर्थिक वर्षातील वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विचारात घेतले जाईल. कौटुंबिक उत्पन्न म्हणजे अर्जदार आणि त्यांच्या पती किंवा पत्नीचे एकत्रित उत्पन्न होय. उत्पन्नाचा पुरावा म्हणून केवळ आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदारांचा अधिकृत दाखलाच ग्राह्य धरला जाणार आहे. इतर कोणतेही कागदपत्र या प्रक्रियेसाठी चालणार नाही, याची अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.

उत्पन्न गटानुसार मर्यादा पाहायची झाल्यास, अत्यल्प गटासाठी वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असणे गरजेचे आहे. अल्प उत्पन्न गटासाठी ही मर्यादा 9 लाखांपर्यंत, तर मध्यम गटासाठी 12 लाखांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. उच्च उत्पन्न गटासाठी मात्र कोणतीही कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. जर एखाद्या व्यक्तीचा मासिक पगार 30,000 रुपये असेल, तर त्याचे वार्षिक उत्पन्न साधारण 3.6 लाख रुपये होते. अशा वेळी जर इतर मार्गाने येणारे उत्पन्न मिळून एकूण कौटुंबिक उत्पन्न 6 लाखांच्या आत असेल, तर ती व्यक्ती अत्यल्प गटातून अर्ज करू शकते. विशेष म्हणजे अत्यल्प गटातील व्यक्तीला अल्प गटातही अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अर्ज भरताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर पती आणि पत्नी दोघेही नोकरी करत असतील, तर दोघांचेही उत्पन्न दाखवणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारची माहिती लपवल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊन भरलेली रक्कम जप्त होऊ शकते. इच्छुकांनी म्हाडा मुंबई मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आपला फॉर्म भरावा. अधिक माहितीसाठी वेबसाईटवर उपलब्ध असलेली जाहिरात पुस्तिका काळजीपूर्वक वाचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







