मुंबई : रसायनशास्त्रात उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणाने आपल्या शिक्षणाचा वापर मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज बनवण्यासाठी करत बदलापूरमध्ये एका कारखान्यात एमडी तयार करून विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर कक्षाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे. घाटकोपर कक्षाने या कारवाईत चार आरोपींना अटक करत ३३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एमडी ड्रग्जसह एकूण ८२ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
अमली पदार्थ विरोधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपर कक्षाच्या पथकाने ११ सप्टेंबरला मानखुर्द येथे कारवाई करत एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. घाटकोपर कक्षाने त्यांच्याजवळून २१ लाख २० हजार रुपये किमतीचे १०६ ग्रॅम एमडी जप्त करून याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. दोघांच्या चौकशीतून एमडी पुरवठा करणाऱ्या तिसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली.
बदलापूर-कर्जत महामार्गाजवळ वांगणी परिसरात ड्रग्ज बनवणारा कारखाना असून तेथून हे ड्रग्ज आणल्याची महत्त्वाची माहिती तिसऱ्या आरोपीने दिली. त्यानुसार, घाटकोपर कक्षाने कारखान्याचा शोध घेत त्यावर छापेमारी करून २०६ किलो वजनाचे विविध प्रकारचे केमिकल, एक किलो ५८० ग्रॅम वजनाची एमडी सदृश्य पांढऱ्या रंगाची पावडर आणि ६२ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले.
घाटकोपर कक्षाने या कारवाईत एमडी ड्रग्ज तयार करणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला अटक केली आहे. त्याने रसायनशास्त्रात घेतलेल्या उच्च शिक्षणाचा वापर एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी करत बदलापूरमधील त्या कारखान्यात एमडी तयार करून विकल्याचे तपासात समोर आले. अखेर, पोलिसांनी एमडी ड्रग्ज निर्मिती करणारा कारखाना सिल करत गुन्ह्याचा पुढील तपास सुरू केला आहे.